Loading

राष्ट्रीय चर्मकार महासंघ स्थापना

राष्ट्रीय चर्मकार महासंघ हे पूर्णतः अ-राजकीय संघटन आहे. विशेष करून समस्त चर्मकार समाजाला संघटीत करून सर्व चर्मकार पोटजाती एकाच संघटनेच्या छत्राखाली आणून तसेच विविध छोट्या मोठ्या संघटना विसर्जित करून तत्कालीन समाजकल्याण मंत्री मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या नेतृत्वाखाली दि. २४ सप्टेंबर १९९५ रोजी ‘महाराष्ट्रीय चर्मकार संघाची’ स्थापना झाली. अर्थात पुढे त्याचे रुपांतर राष्ट्रीय पातळीवर पोहचून “राष्ट्रीय चर्मकार महासंघ” या संघटनेत झाले.

राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून संस्थापक असलेले समाजकल्याण मंत्री मा. श्री. बबनराव (नाना) घोलप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याच अध्यक्षतेखाली दि. २४ सप्टेंबर १९९५ रोजी मुंबईतील शिवतीर्थावर चर्मकार समाजाच्या भव्य मेळाव्याचे आयोजन करून २ ते 3 लाखांची “न भूतो न भविष्यतो” अशी समाज बांधवांची एकी उभ्या महाराष्ट्राने पाहिली.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या चर्मकाराच्या व्याख्येमध्ये पूर्वाश्रमीचा अस्पृश्य आणि चार्मोद्योगाशी संबंधित अश्या सर्वांचा समावेश आहे. चामडयाशी सबंधित व्यवसाय असणाऱ्या सर्व जाती–पोटजातीचे संघटन म्हणून “राष्ट्रीय चर्मकार महासंघ” आहे. विविध संत अर्थात हरळय्या, ककय्या, कल्यानम्मा, संत रविदास, संत विरशैय्या, महात्मा ज्योतीबा फुले, राजश्री शाहू महाराज, शाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, कांशीराम, बाबू जगजीवन राम इ. आमचे आदर्श असल्यामुळे जाती व्यवस्था मोडून समताधिष्ठित समाज निर्मिती हेच राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे ब्रीद आहे.

नांव - राष्ट्रीय चर्मकार महासंघ

प्रथमतः आम्हाला आमची कुटुंब / गाव / जिल्हा / राज्य / देश येथीलच प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करावयाचे आहे. देशातील संघटन मजबूत झाल्यावरच त्याची नाळ विविध राज्यातील चार्माकारांच्या प्रश्नांशी जोडता येईल. आम्हाला आमच्या शक्तीची / मर्यादेची जाणीव आहे. तथापि आम्ही विविध राज्यातील चर्मकारांची सुख-दुखे वेळोवेळी जाणून आहोत.

महासंघ हा शब्द आम्ही बौद्ध तत्वज्ञानातुन घेतला असून भिक्कू संघातील लोकशाही, समता, आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आम्हाला अभिप्रेत आहे.

ध्वज

दोन केशरी रंगाच्या पट्टयांच्यामध्ये पांढरा पट्टा असलेले रुंदीच्या दीडपट लांबीचे आणि निळ्या रंगातील बोधचिन्ह मधोमध आलेले निशाण आमचा ध्वज आहे. वरील केशरी रंग राष्ट्रीय ऐक्यासाठी बलिदान दिलेल्यांचे स्मरण देतो तर तळातील केशरी पट्टा राष्ट्रीय ऐक्यासाठी बलिदानाची प्रेरणा देतो. पांढरा रंग मांगल्याचे, स्वच्छतेचे आणि सुदृढ आरोग्याचे प्रतिक असून त्यामधील बोधचिन्ह आमच्या आमच्या उद्दीष्टाची आम्हाला सतत आठवण देत राहील.

बोधचिन्ह

आरी, रापी आणि हस्ती या चर्मकरांच्या पारंपारिक हत्यारांना चक्राकार फिरवून औद्योगिक चक्रामध्ये रुपांतरीत होणारी नक्षी, आम्ही जुने टाकून नवीन तंत्रज्ञानाला, बदलत्या काळाला सामोरे जाऊ इच्छितो असा बोध देते. त्यासाठी वापरलेला नीळा रंग डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समतेचे प्रतिक म्हणून पांघरलेला मायेचा मार्गदर्शक आहे.

बोधवाक्य

मन चंगा तो काठौती मे गंगा

हे संतश्रेष्ठ राविदासांचे वचन आम्ही बोधवाक्य निवडले असुने प्रामाणिक वर्तणूक आणि श्रमप्रतिष्ठा तसेच आळसाला फाटा देऊन हाती घेतलेले काम निष्ठेने पार पाडण्याचा संदेश देत राहील.

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासदत्व

राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे सभासद होण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा.

सभासदत्व महासंघा बद्दल जाणून घ्या